संस्थेची काही उद्दिष्ट्ये व कार्यक्रम

‘सारथी’ या संस्थेची भारतातील एक दर्जेदार संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्था म्हणून जडण-घडण करण्यात येईल जेणेकरून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या अनुषंगाने सर्व बाबींचा अभ्यास करून संस्था शासनाला त्यावरील उपाययोजना सुचवेल.

‘सारथी’मार्फत लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अनेक कार्यक्रम हाती घेण्यात येतील. त्यापैकी काही ठोस कार्यक्रम असे—

 • विद्यार्थ्यांसाठी संवाद-सूचना कौशल्य, सॉफ्ट स्किल्स, माहिती, इंग्रजीसहित इतर भाषांवर प्रभुत्व, आत्मविश्वास वृद्धी, व्यावसायिक मार्गदर्शन, समुपदेशन, कौशल्य, नैसर्गिक कल इत्यादी विविध कार्यक्रम.
 • विविध विषयांवर वेगवेगळ्या पातळ्यांवर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व इतर कार्यक्रमांचे आयोजन करणे; तसेच सुयोग्य विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके, पुरस्कार, गौरवपत्र देणे जेणेकरून त्यांना भारताचे आदर्श नागरीक बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल.
 • मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या सदस्यांच्या / कुटुंबांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास आणि समजून घेण्यासाठी आणि त्यास सरकारसाठी विविध उपाययोजना सुचविण्यासाठी.
 • किसान मित्र, कौशल्य विकासदूत, तारादूत (महिला सक्षमीकरण दूत), संत गाडगे बाबा दूत (स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत), संविधान दूत, सावित्री दूत इत्यादी विशेष व पथदर्शी प्रकल्प राबविणे.
 • विविध रोजगार संधींचा लाभ लक्षित गटांना मिळावा यासाठी निवासी वा अनिवासी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
 • सहकारी योजना, प्रक्रिया, मूल्यवृद्धी, ब्रॅडींग, फॉर्वर्ड-बॅकवर्ड लिंकेजेस, मार्केटींग, निर्यात अशा व इतर कृषी व कृषी-संलग्न क्षेत्रातील संशोधनाच्या समन्वय, सूचना, माहिती व प्रशिक्षण यासाठी उत्कृष्ट केंद्र (Centre for Excellence) विकसित करून कामे करणे.
 • ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, कृषी-वन पर्यटन, वन पर्यटन यासाठी माहिती व प्रशिक्षणासाठी स्वबळावर किंवा इतर संघटनांच्या सहकार्याने कार्यक्रम हाती घेणे.
 • राज्यातील शेतजमिनीच्या संवर्धन व संधारणासाठी माहिती व शिक्षणासाठी जमीनदल (Land Cadre) तयार करणे.
 • विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी आणि त्यांना परिक्षांत यशस्वी होण्यासाठी विशेष प्रशिक्षण योजना हाती घेणे. उच्चशिक्षणासाठी अधिछात्रवृत्ती (fellowship) देणे.
 • गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विदेशात संशोधन व उच्चशिक्षणासाठी राजर्षी शाहू विदेश अधिछात्रवृत्ती सुरू करणे.
 • वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांसाठी, व्यावसायिक शिक्षणासाठी, प्रवेश परिक्षांसाठी, विदेशी शिक्षणासाठी प्रशिक्षण योजना राबविणे.
 • शेतकरी व महिलांतील दुर्बल गटांसाठी हेल्पलाईन व समुपदेशन केंद्रे सुरू करणे आणि त्यांचे प्रबंधन करणे.
 • महिलांच्या प्रगतीसाठी व सबलीकरणासाठी क्षमतावृद्धी व इतर विशिष्ट प्रकल्प हाती घेणे. तसेच गुणवत्ताधारक महिलांना/मुलींना आरोग्य क्षेत्र, क्रिडा क्षेत्र, कला व हस्तकला आणि इतर नाविन्यपूर्ण क्षेत्रे यांत प्रगतीसाठी आर्थिक पाठबळ देणे.
 • ‘राजर्षी शाहू राष्ट्रीय सार्वजनिक ग्रंथालय’ नावाची राष्ट्रीय पातळीवरील ग्रंथालयाची स्थापना करणे. तसेच, तालुका, जिल्हा पातळीवर ग्रंथालयांची स्थापना करणे.
 • ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना यासाठी विविध शैक्षणिक, माहिती इ. कार्यक्रम हाती घेणे.
 • परंपरागत कृषी प्रणाली व कृषक समाजघटकांच्या नैतिक मूल्ये, कला व हस्तकला, विविध काव्यप्रकार व नाट्यप्रकार, मोडी लिपीसहीत भाषा व साहित्य अशा सांस्कृतिक ठेव्यांचे आणि त्यासंबंधित सर्व प्रकारची ऐतिहासिक व इतर सामग्री संकलित करणे व तिचे जतन करणे.
 • राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याशी संबंधित सर्व व्यक्तिगत कागदपत्रांचे, ऐतिहासिक दस्तावेजाचे तसेच त्यांच्या राज्यकारभार संबंधित आज्ञापत्रे इत्यादींचे संकलन करणे व संरक्षण करणे तसेच त्यांचे प्रकाशन करणे.
 • छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम, राजर्षी शाहू, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे बाबा, सयाजीराव गायकवाड, शहीद भगत सिंह, महर्षी वि. रा. शिंदे, ताराबाई शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदि समाजसुधारकांच्या जीवनकार्यावर तसेच लक्षित गटांच्या संदर्भात महत्त्वाच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणा चळवळींचे अध्ययन व संशोधन करणे. तसेच वरील सर्व समाजसुधारकांच्या जीवन व शिकवणुकीवर चलचित्रपट तयार करणे किंवा प्रायोजित करणे, वस्तुसंग्रहालये उभारणे.
 • भारतभरातील कंपनीच्या उद्दिष्टांशी मिळतीजुळती उद्दिष्टे असणाऱ्या सर्व संस्थाशी जाळे (network) तयार करणे.
 • समाजातील कमजोर वर्गांसाठी, विशेषतः कमी साक्षरता असलेल्या भागांत विविध क्षेत्रांत, विषयांत दर्जेदार शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि त्यांचे प्रबंधन करणे.
 • उपरोक्त उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी विविध कार्यक्रम राबविणे जसे परिषदा, कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रदर्शने आदी यांचे आयोजन.